दिशा सालियनच्या मृत्यूप्रकरणी पुन्हा चौकशी व्हावी, अशी मागणी तिचे वडील सतीश सालियन यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून केली आहे. आदित्य ठाकरेंवर एफआयआर दाखल करून हे प्रकरण सीबीआयकडे द्यावे, असेही ते म्हणाले आहेत.

बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियनचा ८ जून २०२० रोजी संशयास्पद मृत्यू झाला होता. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांनी करून यात काहीही संशयास्पद नसल्याचे त्यांनी आपल्या चौकशी अहवालात म्हटले होते. मात्र आता दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊन या प्रकरणाची पुन्हा नव्याने चौकशी करण्याची मागणी केली आहे. दिशा सालियनच्या मृत्यूमागचे खरे कारण राजकारणामुळे दाबले गेले. त्यामुळे शिवसेनेचे नेते (आदित्य ठाकरे) यांच्यावर एफआयआर दाखल करून सीबीआयकडून चौकशी केली जावी, अशी मागणी सतीश सालियन यांनी केली आहे. मात्र २०२० साली त्यांनी पोलिसांना लिहिलेले एक पत्र आता चर्चेत येत आहे.
काय लिहिले होते पत्रात?
२०२० मध्ये सतीश सालियन यांनी मालवणी विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त दिलीप यादव यांना एक पत्र लिहिले होते. त्यावेळी माध्यमांनी ज्याप्रकारे दिशा सालियनबद्दल बातम्या चालवल्या होत्या, त्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. माध्यमांनी अफवांना बातम्या बनवल्या असून दिशा सालियनच्या मृत्यूचा संबंध अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूशी जोडला, असा आरोप त्यांनी केला होता.
पोलिसांना लिहिलेल्या पत्रात सतीश सालियन यांनी पत्रकार आणि माध्यमांवर खोट्या बातम्या दिल्याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली होती. तसेच बलात्कार, खून प्रकरणातील बातम्या खोट्या असल्याचे त्यांनी म्हटले होते.
माध्यमांनी दिलेल्या बातम्या आणि सुशांत सिंह राजपूतच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर चालवलेली मोहीम आमच्या कुटुंबाचा छळ करणारी आहे. माध्यमातील काही पत्रकार त्यांची मूळ ओळख लपवून आमच्या घरी येतात आणि दिशा सालियनच्या मृत्यूबाबत मुलाखत घेण्याचा प्रयत्न करतात. जे घडलेच नाही, त्याबाबत कंड्या पिकवून बातम्या दिल्या जात आहेत. यामुळे आमच्या कुटुंबियांना मनस्ताप होत आहे, असा आरोप सतीश सालियन यांनी या पत्रात केला होता.
राजकारण्यांशी संबंध नाही
सतीश सालियन यांनी आज आदित्य ठाकरे आणि काही सेलिब्रिटींचे नाव घेतले असले तरी २०२० साली त्यांनी दिशा सालियनचा कोणत्याही राजकारण्याशी किंवा अभिनेत्यांशी संबंध नसल्याचे म्हटले होते. “दिशा सालियनचा संबंध एका मोठ्या राजकीय नेत्याशी जोडला जात आहे. एका पार्टित हे लोक एकत्र आल्याचे म्हटले गेले. तिथे बलात्कार, खून झाल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. या अफवा वृत्तवाहिन्यांसाठी महत्त्वाच्या असतील पण त्याचा वास्तवाशी संबंध नाही”, असे सतीश सालियन म्हणाले.
दिशा सालियनची बदनामी करण्याचा प्रयत्न
सतीश सालियन यांनी आपल्या तक्रारीत असेही म्हटले की, अफवा पसरवून दिशा सालियन आणि आमच्या कुटुंबाला बदनाम केले जात आहेत. काही लोक स्वतःच्या लाभासाठी आमच्या कुटुंबाचा बळी दिला आहे. याचा परिणाम आमच्या मानसिक स्थितीवर होत आहे. मुंबई पोलिसांवर आमचा विश्वास असून त्यांनी केलेल्या तपासावर आम्ही समाधानी आहोत.