दुर्दैवी योगायोग असा की चितमपल्ली यांनाही एकटेपणामुळेच आपली आवडती कर्मभूमी सोडावी लागली.
नागपूर : अरण्यऋषी मारुती चितमपल्ली. ‘जंगल’ प्रत्यक्ष जगलेला माणूस. नोकरीच्या निमित्ताने चितमपल्ली विदर्भात आले आणि विदर्भाचेच झाले. इथल्या जंगलाशी त्यांची नाळ इतकी घट्ट जुळली की पत्नीच्या अकाली निधनानंतर टोकाचा एकाकीपणा वाटय़ाला आला असतानाही त्यांनी नागपूर सोडले नाही. विदर्भातील जंगलाइतकी श्रीमंती इतरत्र कुठेच मला दिसली नाही, ही वनश्रीमंती जगासमोर यायला हवी, या ध्येयाने त्यांनी विदर्भातली शेकडो जंगले अक्षरश: पायी चालून पालथी घातली. त्यातून जे संचित हाती लागले त्याला २५ पुस्तकांच्या रूपाने त्यांनी आपल्या आवडत्या नागपुरातल्या घरीच शब्दबद्ध केले. मात्र, आयुष्याच्या संध्याकाळी त्यांच्या याच जिवलग शहरात आधार देणारे कुणी नसल्याने या व्रतस्थ अरण्यऋषीला वेदनादायी स्थलांतर करावे लागले. अतिशय जड अंत:करणाने त्यांनी नागपूर सोडून सोलापूरची वाट धरली.