जग हायटेक होत आहे, त्यामुळे विधिमंडळाची वाटचालही आता त्याच दिशेने सुरू आहे. आमदारांना एका क्लिकवर सर्व सुविधा मिळाव्या यासाठी सर्व संगणकीकरण करण्यात आले आहे. १९३७ पासूनचा रेकॉर्ड एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.
जग हायटेक होत आहे, त्यामुळे विधिमंडळाची वाटचालही आता त्याच दिशेने सुरू आहे. आमदारांना एका क्लिकवर सर्व सुविधा मिळाव्या यासाठी सर्व संगणकीकरण करण्यात आले आहे. १९३७ पासूनचा रेकॉर्ड एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. १५ ते एक महिन्यात हे काम पूर्ण होईल. करोना काळात अधिवेशन घेता आले नाही. मात्र आता यापुढे अशी वेळ आलीच तर ऑनलाइन अधिवेशन घेण्याएतके सक्षम आपण राहू, अशी माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मटाशी बोलताना दिली आहे.
मुंबई आणि नागपूरच्या विधिमंडळात अत्याधुनिक सुविधा निर्माण करण्यावर भर दिला जात आहे. सभागृहातील भाषणे, कायदे यांची माहिती तत्काळ सदस्यांना मिळावी यासाठी यासाठी हायटेक तंत्रज्ञानावर भर दिला जात आहे. विधिमंडळाचे कामकाज पेपरलेस होत आहे. आमदारांसमोर लावलेल्या संगणकावरच सर्व माहिती उपलब्ध होईल. विधिमंडळाचा सर्व कारभार ऑनलाइन चालेल. करोनाच्या काळात इतर अनेक विभागांची कामे ऑनलाइन झाली. सर्व व्यवहार आणि बैठका ऑनलाइन होत होत्या. मात्र विधिमंडळात तसे करता आले नाही. करोनासारखी वेळ कधी येऊ नये, मात्र तांत्रिकदृष्ट्या आपण सुसज्ज असावे, हा यामागील उद्देश आहे, असे नार्वेकर म्हणाले.
विधिमंडळात संविधान अभ्यास केंद्र
नव्या आमदारांना संविधानाचा अभ्यास करता यावा यासाठी अधिवेशन नसताना विधिमंडळ परिसरात संविधानाचे प्रशिक्षण देणारी यंत्रणा उभी केली जात आहे. मार्च २०२५ पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे, असे राहुल नार्वेकर यांनी सांगितले.
शिस्त पाळा, अन्यथा कठोर निर्णय
७३ आमदार पहिल्यांदाच सभागृहात आले आहेत. त्यांनाही बोलण्याची संधी मिळावी हा प्रयत्न असेल. विरोधी बाकांवर अवघ्या ५० च्या घरात आणि सत्ताधारी बाकांवर २३० हून अधिक सदस्य आहेत. मात्र यात समतोल साधण्याचा प्रयत्न असेल. सर्वांना समान संधी मिळेल. सभागृहातील गोंधळ हा संसदीय लोकशाहीला कमकुवत करण्याचे काम करतो. त्यामुळे सभागृहात योग्य चर्चा व्हावी, वेळ वाया जाऊ नये याला प्राधान्य देण्यात येईल. प्रसंगी कठोर निर्णय घेणार, असे राहुल नार्वेकर म्हणाले.
विधिमंडळाचे टीव्ही चॅनल लवकरच
संसद टीव्ही प्रमाणे महाराष्ट्रातही विधिमंडळाचे टीव्ही चॅनल असेल यासाठी प्रयत्न सुरू आहे. जनजागृतीसाठीही याचा उपयोग केला जाईल. सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू ठेऊन कामकाजाचे प्रसारण केले जाईल, अशी माहिती राहुल नार्वेकर यांनी दिली. विधिमंडळ परिसरात सेंट्रल हॉल तयार करण्यात येणार. प्रशासकीय इमारत बांधण्याचेही नियोजन आहे. विधिमंडळासमोरील अर्धवट स्थितीत असलेली एन. कुमार यांची इमारत प्रशासकीय कामकाजासाठी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहे. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत भूमी अधिग्रहणाचे काम सुरू आहे.