सोयाबीन खरेदी नोंदणीची मुदत ६ जानेवारीपर्यंत वाढवण्याचा निर्णय पाच दिवसांपुर्वी सरकारने घेतला खरा, पण त्याचा काहीच परिणाम बाजारावर जाणवलेला नाही.
अमरावती : सोयाबीन खरेदी नोंदणीची मुदत ६ जानेवारीपर्यंत वाढवण्याचा निर्णय पाच दिवसांपूर्वी सरकारने घेतला खरा, पण त्याचा काहीच परिणाम बाजारावर जाणवलेला नाही. दरांमध्ये घसरण सुरूच आहे. शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी किमतीत सोयाबीन विकावे लागत आहे. गेल्या आठवडाभरात सोयाबीनचे दर १२० रुपयांनी घसरले आहेत.
किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत राज्यात सोयाबीनची खरेदी ४ हजार ८९२ रुपये प्रतिक्विंटल या हमीभावाने सुरू आहे. यापूर्वी ३१ डिसेंबरपर्यंत सोयाबीन खरेदी नोंदणीची मुदत होती. आता नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी नाफेड आणि ‘एनसीसीएफ’ यांच्यामार्फत १२ जानेवारीपर्यंत केली जाणार आहे. पण, अजूनही सरकारी खरेदीला गती मिळालेली नाही. ओलाव्याचे प्रमाण आणि इतर अनेक अटींमुळे हमीभाव खरेदी केंद्रापेक्षा खुल्या बाजारात सोयाबीन विक्री करण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे.
बारदाणा संपण्याच्या स्थितीत
जिल्ह्यात हमीदराने सोयाबीन खरेदी करण्यासाठी विदर्भ मार्केटिंगची अकरा व जिल्हा मार्केटिंगची नऊ अशी एकूण वीस केंद्र सुरू करण्यात आली आहेत. या केंद्रांना पुरवण्यात आलेला बारदाणा आता संपत आला आहे. आणखी एक दोन दिवस पुरतील इतकाच साठा शिल्लक असल्याचे खरेदी केंद्र संचालकानी सांगितले. राज्यभरात नाफेडची सोयाबीन खरेदी सुरू आहे. त्यासाठी ५६१ केंद्र सुरू करण्यात आली आहेत. १४ लाख १३ हजार मेट्रीक टन सोयाबीन खरेदीचे उद्दीष्ट असून आतापर्यंत साडेतीन लाख क्विंटल खरेदी झाली आहे.
१५ ऑक्टोबरपासून खरेदी प्रारंभ झाली असून जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४८ हजार क्विंटल सोयाबीन खरेदी झाली आहे. तर, १८ हजारचे जवळपास नोंदणी झाली आहे. प्रत्येक केंद्रांवर पाचशेहून अधिक अर्ज नोंदणीसाठी प्रलंबित आहेत. गेले दोन दिवस पोर्टल वर नोंदणीसाठी अडचणी आल्या. एका अर्जाच्या नोंदणीसाठी तास दोन तासाचा वेळ लागत आहे.