भाजपा आमदार सुरेश धस यांनी प्राजक्ता माळीचं नाव घेऊन वक्तव्य केलं. त्यासंदर्भात अमेय खोपकर यांनी पोस्ट केली आहे.
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राजकारण चांगलंच तापलं आहे. भाजपा आमदार सुरेश धस यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाविषयी बोलताना धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली. मुंडेंवर टीका करताना धस यांनी प्राजक्ता माळी, सपना चौधरी आणि रश्मिका मंदाना या अभिनेत्रींची नावं घेतली. परळीत राजकारणाचे इव्हेंट मॅनेजमेंट झाले आहे, असं म्हणत त्यांनी परळी पॅटर्नचा उल्लेख केला. धस यांच्या या वक्तव्यानंतर ते टीकेचे धनी ठरले आहेत. आता मनसे नेते व प्रसिद्ध चित्रपट निर्माते अमेय खोपकर यांनी पोस्ट करून धस यांना सुनावलं आहे.
सुरेश धस यांचं हे वक्तव्य अभिनेत्रींवर खोटेनाटे आरोप करुन हलकी प्रसिद्धी मिळवण्याचा प्रकार असल्याचं अमेय खोपकर यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले होते सुरेश धस?
परळीमध्ये विटभट्ट्या, जमिनी बळकावून त्यावर अवैध बांधकाम केले जाते आणि प्रचंड पैसा मिळवला जातो. त्याच पैशातून इव्हेंट मॅनेजमेंट केले जाते. “इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स ज्यांना करायचं असेल, त्यांनी परळीला यावं. शिक्षण घेऊन पूर्ण देशात त्याचा प्रसार करावा. सपना चौधरी, रश्मिका मंधाना, प्राजक्ता माळीसुद्धा आमच्याकडे येतात. जर कुणाला चित्रपट काढायचा असेल तर या अशा मोठ्या विभूतींवर काढता येईल. प्राजक्ताताई माळी सुद्धा आमच्या परळीत येतात. परळीचा हाही एक पॅटर्न आहे,” असं वक्तव्य सुरेश धस यांनी केलं.
सुरेश धस यांच्या वक्तव्याबद्दल अमेय खोपकर म्हणाले…
“सुरेश धस, तुमच्या गलिच्छ राजकारणात आमच्या कलाक्षेत्रातील माता-भगिनींना ओढू नका. अशाप्रकारे माता-भगिनींची बदनामी करणं हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला बट्टा लावणारं आहे. अभिनेत्रींवर खोटेनाटे आरोप करुन हलकी प्रसिद्धी मिळवण्याचे हे प्रकार त्वरित थांबलेच पाहिजेत,” अशी पोस्ट अमेय खोपकर यांनी एक्सवर केली आहे.
दरम्यान, सुरेश धस यांच्या वक्तव्याचा अनेक राजकीय नेते निषेध करत आहेत. अभिनेत्री प्राजक्ता माळी यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन धस यांच्या टीकेला उत्तर देणार आहे, अशी माहिती तिने लोकसत्ताशी बोलताना दिली.