राज्यातील राजकीय आणि इतर सर्व महत्त्वाच्या घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
आज नवीन वर्षाची (२०२५) सुरुवात झाली आहे. तसेच कोरोगाव भीमा (Koregaon Bhima Shaurya Din) या ठिकाणी आज (१ जानेवारी) २०७ वा शौर्य दिन उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमा या ठिकाणी विजयस्तंभाला लाखो अनुयायींनी अभिवादन केलं आहे. याबरोबरच गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यातील मस्सोजग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण चर्चेत आहे. या प्रकरणाचा तपास सीआयडीकडून सुरु आहे. या घटनेतील काही आरोपींना पोलिसांनी अटक केलं आहे तर काही आरोपी अद्याप फरार आहेत, त्यांचाही पोलीस शोध घेत आहेत. तसेच खंडणीच्या गुन्ह्याप्रकरणी वाल्मिक कराड मंगळवारी पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरण आला. त्यानंतर कराडला केजच्या न्यायालयात दाखल करण्यात आलं असता १४ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. तसेच या प्रकरणी भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी विधानसभेत आवाज उठवला होता. यासह राज्यातील राजकीय आणि इतर सर्व महत्त्वाच्या घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.