संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी शनिवारी बीडमध्ये सर्वपक्षीय मेळावा आयोजित करण्यात आला होता.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वपक्षीय नेते एकवटले आहेत. वाल्मिक कराड हा या हत्येमागचा सूत्रधार असल्याचा आरोप बीडमधील जनता व अनेक लोकप्रतिनिधिंनी केला आहे. मात्र, मंत्री धनंजय मुंडे व त्यांचा पक्ष (अजित पावारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) वाल्मिकला पाठिशी घालत असल्याचा आरोपही होत आहे. दरम्यान, वाल्मिक कराडला अटक करावी, देशमुख कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा या मागणीसाठी बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा आयोजित करण्यात आला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे देखील या मोर्चात सहभागी झाले होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) प्रवक्त्या रुपाली ठोंबरे यांनी या मोर्चाच्या उद्दीष्टांवर शंका उपस्थित केली आहे. तसेच आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.