एलॉन मस्क यांनी ब्रिटनमधील अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या लैंगिक शोषणाचा मुद्दा पुढे करून पाकिस्तानच्या ग्रुमिंग गँगवर टीका केली. त्यानंतर ब्रिटनच्या पंतप्रधानांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
टेस्ला कंपनीचे प्रमुख आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांनी ब्रिटनमधील ग्रुमिंग गँगचा मुद्दा समोर आणल्यानंतर आता युरोपसह जगभरात खळबळ उडाली असून विद्यमान पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्या राजीनाम्याची मागणी होऊ लागली आहे. पाकिस्तानी पुरुषांच्या ग्रुमिंग गँगने मागच्या काही वर्षात हजारो अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केले असल्याची माहिती बाहेर येत आहे. या विषयामुळे ब्रिटनच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या गुन्ह्यात आरोपी पाकिस्तानी वंशाचे पुरुष असल्याचे आढळून आले आहे.
अब्जाधीश एलॉन मस्क यांनी आरोप केला की, ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर हे ग्रुमिंग गँगला रोखण्यात अपयशी ठरले आहेत. तसेच ब्रिटनच्या मंत्री जेस फिलिप्स यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी मस्क यांनी केली आहे. ओल्डहॅम शहरात झालेल्या लैंगिक शोषणांच्या प्रकरणांची सरकारी पातळीवर चौकशी करण्याची मागणी त्यांनी धुडकावून लावल्याचा आरोप केला जात आहे. याऐवजी फिलिप्स यांनी रॉदरहॅम आणि टेलफोर्ड शहराप्रमाणे स्थानिक पातळीवर चौकशी करण्याचे आदेश दिले होते. या निर्णयानंतर सत्ताधारी मजूर पक्षावर हुजूर पक्षाने टीका केली असून सरकारने या गुन्ह्यात बळी पडलेल्यांना वाऱ्यावर सोडले असल्याचा आरोप केला.
राजकीय जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, एलॉन मस्क हे जाणीवपूर्वक स्टार्मर सरकारला लक्ष्य करत आहेत. जेणेकरून उजव्या विचारसरणीच्या हुजूर पक्षाला पुन्हा एकदा उभारी मिळेल.
ग्रुमिंग गँग म्हणजे काय?
ग्रुमिंग गँग हा गुन्हेगारांचा एक गट असल्याचे सांगितले जाते. या गटात पाकिस्तानी वंशाच्या पुरुषांचा समावेश असून ते अल्पवयीन मुलींना लक्ष्य करतात. सोशल मीडिया, गेमिंग आणि चॅट रुम्स अशा ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सचा वापर करून हे लोक अल्पवयीन मुलींना हेरतात. ग्रुमिंग गँगचे गुन्हेगार मुलींना नशेच्या आहारी नेतात. मुलींचे अश्लील व्हिडीओ आणि फोटो गोळा करून नंतर त्यांचे लैंगिक शोषण करतात. लैंगिक अत्याचाराच्या गर्तेत सापडलेल्या अनेक मुली गर्भवती राहिल्या असून काही जणींची मानवी तस्करी केली गेल्याचे माध्यमात आलेल्या बातम्यांतून समोर येत आहे.
आकडेवारी काय सागंते?
पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, वर्ष २०२३ मध्ये ब्रिटनमध्ये १.१५ लाख लहान मुलांवरील लैंगिक अत्याचाराचे गुन्हे दाखल झाले आहेत. यापैकी ४,२२८ गुन्हे हे संघटित गुन्हेगारीच्या प्रकारात मोडत आहेत. १७ टक्के गुन्ह्यात ग्रुमिंग गँगचा समावेश असल्याचे सांगितले जाते.
एप्रिल २०२३ मध्ये तत्कालीन पंतप्रधान ऋषी सुनक यांनी ग्रुमिंग गँगच्या प्रकरणांचा छडा लावण्यासाठी एक कार्य समिती स्थापन केली होती. या समितीने पहिल्याच वर्षी ५५० संशयितांना ताब्यात घेतले होते.
ब्रिटनच्या ओल्डहॅम, रॉदरहॅम आणि टेलफोर्ड कॉर्नवाल आणि इतर शहरात १९९७ ते २०१३ पर्यंत कमीतकमी १४०० अल्पवयीन मुलींना लैंगिक अत्याचाराचे शिकार बनविले गेले असल्याची माहितीही समोर येत आहे.