दक्षिण कोरियामध्ये एक भीषण विमान अपघात घडला आहे.
२०२४ वर्ष संपण्यास अवघे काही दिवस शिल्लक आहेत. या चालू वर्षाच्या अखेरच्या महिन्यात एकापाठोपाठ एक असे अनेक भीषण विमान अपघात घडले आहेत. या अपघातांमध्ये शेकडो लोकांनी आपला जीव गमावला असून यामध्ये सर्वात मोठा अपघात आज (२९ डिसेंबर) दक्षिण कोरियामध्ये झाला आहे. या विमान अपघातात १७७ जणांना मृत्यू झाला आहे.
डिसेंबर महिन्यात झालेल्या या अपघातांमुळे विमान प्रवास खरंच सुरक्षित आहे का? विमान सेवा देणाऱ्या कंपन्यांकडून सुरक्षेसंबंधी बाबींची खरंच योग्य काळजी घेतली जाते का? यासंबंधी प्रश्न उपस्थित झाले आहेत. यादरम्यान आपण जगभरात २०२४ च्या डिसेंबर महिन्यात आतापर्यंत झालेल्या काही अपघातांचा आढावा घेणार आहोत.
दक्षिण कोरिया विमान अपघात
वर्षातील सर्वात मोठी विमान अपघाताची घटना ही दक्षिण कोरियातील मुआन विमानतळावर घडली आहे. येथे बँकॉकहून परतणाऱ्या जेजू एअरलाइन्सच्या प्रवासी विमानाला भयंकर अपघात होऊन अनेकांनी आपला जीव गमावला आहे. विमानाच्या लँडिंग गियरमध्ये बिघाड झाल्याने वैमानिकांना हे विमान सुरक्षितपणे लँड करता आले नाही. लँडिंग करताना विमान धावपट्टीवर घसरत जाऊन विमानतळाच्या भिंतीवर आदळले. या धडकेमुळे विमानाला भीषण आग लागली. ज्यामध्ये किमान १७७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या विमानात १८१ लोक प्रवास करत होते. सध्या या अपघाताची नेमकी कारणे शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे.
अझरबैजान एअरलाइन्स विमान अपघात
अझरबैजान एअरलाइन्स एम्ब्रेर ERJ-190AR हे विमान २५ डिसेंबर रोजी कझाकस्तानमधील अकताउ विमानतळाजवळ क्रॅश झाले होते. या भीषण अपघातात ३८ लोक ठार झाले. हे विमान अझरबैजानची राजधानी बाकूहून ग्रोझनीला जात होते. या विमानात ६७ जण प्रवास करत होते, ज्यापैकी ३८ लोक ठार झाले आहेत. तर इतर अनेकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ब्राझील विमान अपघात
ब्राझीलमध्ये एकाच कुटुंबातील १० जणांचा २२ डिसेंबर रोजी झालेल्या एका खाजगी विमान अपघातात मृत्यू झाला होता. दक्षिण ब्राझीलमधील लोकप्रिय पर्यटन शहर ग्रामाडोच्या मध्यभागी १० जणांना घेऊन जाणारे हे छोटे विमान कोसळले. तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमान पहिल्यांदा शहरातील एका इमारतीच्या धुराड्याला धडकले नंतर त्याच्यावरील वैमानिकाचे नियंत्रण सुटले काही रहिवाशी इमारतींना धडकत शेवटी ते एका फर्निचरच्या दुकानावर कोसळले. या भीषण अपघातात प्रवाशांपैकी कोणीही बचावले नाही. या घटनेत जमिनीवर १७ लोक देखील जखमी झाले होते.
पापुआ न्यू गिनी विमान अपघात
नॉर्थ कोस्ट एव्हिएशनकडून चालवले जाणारे ब्रिटन-नॉर्मन BN-2B-26 आयलँडर हे विमान २२ डिसेंबर रोजी पापुआ न्यू गिनीमध्ये कोसळले. या भीषण अपघातात विमानत प्रवास करत असलेले सर्व पाचही लोक ठार झाले. हे विमान वासू विमानतळावरून (Wasu Airport) लेय-नादजाब (Lae-Nadzab Airport) विमानतळाकडे जात होते. या विमानाचे अवशेष दुसऱ्या दिवशी सापडले. या विमानाचा शेवटचा संपर्क ते कोसळण्याच्या काही मिनिटांपूर्वी झाला होता. या विमान अपघाताचा सखोल तपास सुरू आहे.
अर्जेंटिना विमान अपघात
द बाँबारडीयर BD-100-1a10 चॅलेंजर 300 हे विमान अर्जेंटिनामधील सन फर्नांडो विमानतळाजवळ कोसळले. या दुर्घटनेत दोन्ही वैमानिकांचा मृत्यू झाला. हे विमान पुंता डेल एस्टे (Punta del Este) Airport विमानतळावरून सॅन फर्नांडो विमानतळाकडे जात होते. धावपट्टीवर उतरत असताना हे विमान विमानतळाचे कुंपण आणि झाडावर जाऊन आदळले त्यानंतर या विमानाला आग लागली, ज्यामध्ये होरपळून वैमानिकांचा मृत्यू झाला.
हवाई विमान अपघात
याच महिन्यात १७ डिसेंबर रोजी कमाका एअर एलएलसीचे सेस्साना 208B ग्रँड कॅरव्हॅन हे विमाना होनोलुलू येथील डॅनियल के इनूये आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ (Daniel K Inouye International Airport) कोसळले. या दुर्घटनेत देखील दोन्ही वैमानिकांचा मृत्यू झाला.
जगभरात झालेल्या या विमान अपघातांमुळे विमान वाहतुकीच्या सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. तांत्रिक बिघाड ते खराब हवामान अशी अनेक कारणे या विमान अपघातांसाठी दिली जातात. मात्र या अपघातांमुळे विमान सेवा देणार्या कंपन्यांवर विमानाच्या देखभालीसंबंधीचे स्टँडर्ड आणखी वाढवण्याबद्दल दबाव वाढताना दिसत आहे.