देवेंद्र फडणवीस : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकार कोणत्याही चर्चेसाठी तयार असल्याचं सांगत विरोधकांनी उगाच राजकारण करू नये असा सल्ला दिला आहे. तसंच काँग्रेसने ओबीसींवर अन्यायच केल्याचा आरोपी त्यांनी केला.
नागपूर : काँग्रेसला ओबीसींवर बोलण्याचा अधिकार नाही. त्यांनी ओबीसींवर कायमच अन्याय केला. राज्यातील पहिले ओबीसी मंत्रालय माझ्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात झाले. ओबीसी समाजाकरिता ४८ जीआर महायुतीच्या सरकारने काढले. महाज्योतीची स्थापना, ५२ ओबीसी वसतिगृहे, ओबीसींसाठी पीएचडी तसेच विदेशी शिक्षणाची व्यवस्था आम्ही केली आहे. ओबीसींना संवैधानिक दर्जा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. त्यांना वैद्यकीय शिक्षणातील आरक्षण मोदींनी दिले. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये सर्वाधिक ओबीसी मंत्री आहेत. त्यामुळे काँग्रेसमध्ये नाना पटोले, विजय वडेट्टीवारांवर होणाऱ्या अन्यायाचा राग त्यांनी आमच्यावर काढू नये, अशी टीका मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.
‘सरकार हव्या त्या विषयावर चर्चेसाठी तयार आहे. विरोधकांनी उगाच राजकारण करू नये’, असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विरोधकांना दिले.
विरोधकांनी माध्यमांवर चर्चा न करता सभागृहात बोलावे, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ‘आम्ही सभागृहात चर्चेला तयार आहोत. पण, सरकारने खोटे बोलू नये’, असे म्हणत आव्हान दिले होते. त्याला प्रत्युत्तर देताना फडणवीस म्हणाले, ‘अंबादास दानवे तसेच सर्व विरोधकांनी हव्या त्या विषयावर चर्चा करावी. महत्त्वाचे विषय मांडावेत. सरकार उत्तर द्यायला सक्षम आहे. सरकार कुठलीही बाजू लपवून ठेवणार नाही वा मागे-पुढे पाहणार नाही. मात्र, विरोधकांनी केवळ राजकारण करायचे ठरविले तर राजकीयच उत्तर मिळेल.’
पुरवणी मागण्यांवर बोलताना ते म्हणाले, ‘३५ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मांडल्या आहेत. त्या लवकरच चर्चेनंतर मान्य होतील. आपला अर्थसंकल्प सहा लाख कोटींहून मोठा आहे. जेव्हा आपला अर्थसंकल्प दोन-अडीच लाख कोटींचा होता तेव्हादेखील आपण पंधरा हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मांडायचो. नवीन अकाउंटिंग सिस्टीम आल्यापासून पुरवणी मागण्यांमध्ये वाढ झाली आहे. कारण, पूर्वी आपण वर्षभरातल्या सगळ्या गोष्टी बजेटेड करायचो. आता आपण त्या अर्थसंकल्पित केल्या तरी प्रत्यक्षात त्या मागण्यांच्या संदर्भातील बजेटिंग पुरवणी मागण्यांमध्ये करतो. योग्य चर्चा करून त्या मान्य करण्यात येतील.’
जितेंद्र आव्हाड यांनी ईव्हीएमबाबत व्यक्त केलेल्या शंकेवर बोलताना ते म्हणाले, ‘आव्हाड मनाला येईल ते बोलतात. त्यासाठी त्यांना कुठलाही पुरावा लागत नाही. त्यांनी केलेल्या विधानावर मला उत्तर विचारू नका. काही लोक त्यांच्याप्रमाणेच बोलणारे आहेत, त्यांना जाऊन विचारा.’