भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने महाराष्ट्राविरुद्धच्या सामन्यात जबरदस्त स्पेल टाकला. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पाकिस्तान आणि दुबईमध्ये होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ आधी टीम इंडियासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने टीम इंडियाचा विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत महाराष्ट्रविरुद्ध दमदार गोलंदाजी करत सर्वांचं लक्ष वेधलं आहे. जसप्रीत बुमराहला दुखापत झाली असताना अर्शदीपला सूर गवसल्याने भारतासाठी आनंदाची बातमी आहे. अर्शदीपने महाराष्ट्राच्या तिन्ही टॉप ऑर्डर बॅट्समनला तंबूत पाठवले, त्याच्या शानदार स्पेलचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अर्शदीपने ऋतुराजला केले क्लीन बोल्ड –
वास्तविक, विजय हजारे ट्रॉफीचा उपांत्यपूर्व सामना पंजाब आणि महाराष्ट्र यांच्यात झाला होता. ज्यामध्ये प्रथम गोलंदाजी करणाऱ्या पंजाबसाठी अर्शदीप सिंगने कहर केला. त्याने महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाडला गुडघे टेकायला भाग पाडले. अर्शदीपने नवीन चेंडूने आधी गायकवाडला त्रास दिला आणि नंतर बाहेर जाणाऱ्या चेंडूवर त्याचा ऑफ स्टंप उखडून त्याला क्लीन बोल्ड केले. गायकवाडला हा चेंडू समजला नाही आणि केवळ ५ धावा करून तो माघारी परतला. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या सिद्धेश वीरला भोपळाही फोडू दिला नाही. त्यामुळे पंजाबने अवघ्या आठ धावांत महाराष्ट्राच्या दोन धक्के दिले.
अर्शदीप सिंगचा कहर –
अर्शदीप सिंग इथेच थांबला नाही, यानंतर त्याने महाराष्ट्रासाठी शतक झळकावणाऱ्या अर्शिन कुलकर्णीचीही विकेट घेतली. विजय हजारे ट्रॉफीमध्ये पदार्पण करणाऱ्या कुलकर्णीने १३७ चेंडूत १४ चौकारांसह १०७ धावा केल्या. त्यामुळे प्रथम फलंदाजी करताना महाराष्ट्राला ५० षटकांत ६ बाद २७५ धावा केल्या. पंजाबसाठी दमदार गोलंदाज करताना अर्शदीप सिंगने ९ षटकांच्या स्पेलमध्ये एक निर्धाव षटक टाकत ५६ धावा देत ३ विकेट्स घेतल्या.
चॅम्पियन ट्रॉफिसाठी भारतीय संघात दावा केला मजबूत –
अशाप्रकारे टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने अर्शदीप सिंगच्या फॉर्म पाहून सुटकेचा नि:श्वास सोडला असेल. कारण जसप्रीत बुमराह दुखापतग्रस्त असल्याने सर्वांना अर्शदीप सिंगकडून खूप अपेक्षा आहेत. त्यामुळे आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी टीम इंडियामध्ये त्याची निवड जवळपास निश्चित मानली जात आहे. अर्शदीपने आतापर्यंत भारतासाठी आठ एकदिवसीय सामन्यांमध्ये १२ विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर ६९ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याच्या नावावर ९५ विकेट्स आहेत.