उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पत्रकारांनी त्यांना मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याविषयी विचारले.
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघत आहेत. अशात अनेक राजकीय नेत्यांसह समाजिक कार्यकर्त्यांनी या हत्येतील आरोपींचा धनंजय मुंडे यांच्याशी कथित संबंध असल्याचा आरोप करत, मुंडे यांच्या कॅबिनेट मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. पुण्यात आज उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत विचारले असता ते म्हणाले, “पक्ष वगैरे न बघता दोषी आढळणाऱ्यावर कडक कारवाई करणार आहे.”
अशा घटना खपवून घेणार नाही.
उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पत्रकारांनी त्यांना मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याविषयी विचारले. यावर अजित पवार म्हणाले, “या हत्या प्रकरणाचा विविध तपास यंत्रणा तपास करत आहेत. त्याच्यबरोबर मुख्यमंत्र्यांनीही सांगितले आहे, या प्रकरणात कोणी दोषी असल्याचे सिद्ध झाले तर त्याच्यावर ताबडतोब कारवाई केली जाईल. मी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांना भेटून सांगितले आहे की, पक्ष वगैरे न बघता यामध्ये वरिष्ठ पातळीवर काम करणारे कोणी दोषी असतील तर त्यांची गय करण्याचे कारण नाही. ही निर्घून पद्धतीने झालेली हत्या आहे. अशा प्रकारच्या घटना आम्ही खपवून घेणार नाही.”
बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरून विरोधी पक्ष आणि विविध सामाजिक संघटनांनी आंदोलनं सुरू केली आहेत. या हत्याप्रकरणामुळे धनंजय मुंडे वादाच्या केंद्रस्थानी सापडले असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. धनंजय मुंडे यांचे कथित निकटवर्तीय वाल्मिक कराड यानेच देशमुख यांच्या हत्येचा कट रचला होता, असा आरोप केला जात आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी हत्या करण्यात आली होती. या हत्येला एक महिना होऊनही अद्याप सर्व आरोपींना अटक झालेली नाही. गेल्या आठवड्यात मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह सुधीर सांगळेला अटक करण्यात आली होती. सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे हत्या झाल्यानंतर फरार झाले होते. त्यांना पकडण्यासाठी सीआयडीने प्रसिद्धीपत्रक जारी करत त्यांना फरार घोषित केले होते. त्यानंतर ४ जानेवारीला या दोघांना अटक झाली होती. तर तिसरा आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे.