(उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील विविध कामांचा आढावा घेण्यासाठी पियुष गोयल यांनी शनिवारी पालिका मुख्यालयात एका संयुक्त बैठकीचे आयोजन केले होते.-छायाचित्र)
मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी भाजपने तयारी सुरू केली असून भाजपचा बालेकिल्ला असलेल्या उत्तर मुंबईतून भाजपचे ४० नगरसेवक निवडून आणण्याचा निर्धार पियुष गोयल यांनी व्यक्त केला.
मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी भाजपने तयारी सुरू केली असून भाजपचा बालेकिल्ला असलेल्या उत्तर मुंबईतून भाजपचे ४० नगरसेवक निवडून आणण्याचा निर्धार खासदार आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केला. सध्या राज्यात डबल इंजिन सरकार असून महापालिका निवडणुकीनंतर ट्रिपल इंजिन सरकार आणून मुंबईचा विकास करणार, त्यासाठी महापालिकेची निवडणूक लवकर होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील विविध कामांचा आढावा घेण्यासाठी पियुष गोयल यांनी शनिवारी पालिका मुख्यालयात एका संयुक्त बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला मुंबई महापालिका, म्हाडा, एसआरए, एमएमआरडीए, एमएसआरडी, जिल्हाधिकारी आदी विविध प्राधिकरणांचे प्रतिनिधी उपस्थित होते. पालिका आयुक्त भूषण गगराणी आणि एमएमआरडीएचे आयुक्त संजय मुखर्जी यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. या बैठकीला उत्तर मुंबईतील कांदिवलीचे भाजपचे आमदार अतुल भातखळकर, दहिसरच्या मनीष चौधरी, तसेच माजी नगरसेवकही उपस्थित होते. या बैठकीत उत्तर मुंबईतील विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. दहिसर, बोरिवली, कांदिवली, मालाड दरम्यानच्या या मतदारसंघातील आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा यांच्याशी संंबंधित सर्व प्रकल्पांना गती देण्याच्या दृष्टीने या बैठकीत चर्चा करण्यात आली. गोयल खासदार झाल्यापासून गेल्या पाच महिन्यांतील ही तिसरी बैठक होती. उत्तर मुंबईला उत्तम मुंबई करण्याचे आमचे लक्ष्य असल्याचे यावेळी गोयल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
६० हजार कोटींची कामे..
उत्तर मुंबई मतदारसंघात विविध प्राधिकरणांची तब्बल ६० हजार कोटींची कामे सुरू असून येत्या काही वर्षांत उत्तर मुंबईचा कायापालट होणार आहे. मुंबई बाहेरून येणाऱ्या नागरिकांनाही या सोयी – सुविधांचा लाभ मिळेल, असेही ते म्हणाले. लोखंडवाला डीपी रोड, मालाड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट, डेव्हलपमेंट प्लेग्राऊंड, स्वच्छता मोहीम, पर्यटनस्थळांची ओळख आणि विकासासाठी नियोजन, १०० स्वयं-सहाय्यता गटांना प्रशिक्षण देण्यासाठी उपक्रम, कोळी समाजासाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन, सांस्कृतिक केंद्र उभारणी, बोरिवली (पूर्व) येथे वाहनतळ निर्माण करणे, आरोग्य सेवा सुधारण्यासाठी उपाययोजना, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बुद्ध पुतळ्याबाबत अभ्यास आणि योजना, पोईसर नदी रुंदीकरण, पुनर्वसन इत्यादी विषयांवर विस्तृत चर्चा करण्यात आली. उत्तर मुंबईतील विकास योजनांमध्ये पुनर्विकास, पायाभूत सुविधांमध्ये वाढ, नागरी सुविधा, वाहतूक व्यवस्थापन, सार्वजनिक सेवा, टोल प्लाझा, शहर सुशोभीकरण आणि प्रदूषण नियंत्रण आदींचा समावेश आहे.
आढावा बैठकीमुळे आयुक्तांच्या दालनाबाहेर गर्दी
तब्बल चार पाच तास चाललेल्या या बैठकीसाठी विविध प्राधिकरणांचे अधिकारी पालिका आयुक्तांच्या दालनाबाहेरील जागेत ताटकळत उभे होते. विविध प्राधिकरणांच्या सर्वच अधिकाऱ्यांना शनिवारी सुट्टीच्या दिवशी बोलावल्यामुळे पालिका मुख्यालयातील जुनी इमारत गजबजली होती. आयुक्तांच्या दालनाबाहेर अधिकारी आणि प्रसारमाध्यमांच्यां प्रतिनिधींची गर्दी झाली होती.