संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी कधीच सापडणार नाहीत, असा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे.
बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज (२८ डिसेंबर) बीडमध्ये सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात येत आहे. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करावी, या मागमीसाठी हा मोर्चा काढला जात आहे. या प्रकरणात भाजपाचे आमदार सुरेश धस आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सुरुवातीपासून आक्रमक भूमिका घेतलेली असून सर्व आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे. तत्पूर्वी अंजली दमानिया यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तीन आरोपांचा खून झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.
अंजली दमानिया काय म्हणाल्या?
अंजली दमानिया यांनी माध्यमांशी संवाद साधला असताना हा दावा केला. “काल रात्री मला एका अनोळखी इसमाचा फोन आला. त्याने व्हॉट्सअप कॉलवर बोलण्याची विनंती केली. पण नेटवर्कमुळे कॉल कनेक्ट होऊ शकला नाही. त्यानंतर त्या इसमाने मला व्हॉईस नोट पाठवली. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी आता कधीच सापडणार नाहीत, कारण तीन आरोपींचा खून झाला आहे, अशी माहिती या इसमाने दिली”, असा खळबळजनक दावा अंजली दमानिया यांनी केला.अंजली दमानिया पुढे म्हणाल्या, “हे ऐकून मी हबकलेच. ही माहिती मी पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांना दिली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात एकूण सात आरोपी असून त्यापैकी तिघांचा खून झाल्याची माहिती अनोळखी इसमाने दिली आहे. तसेच या तिघांचे मृतदेह कुठे पुरले? याचीही माहिती समोरच्या व्यक्तीने दिली आहे.” या माहितीची मी खातरजमा केलेली नाही आणि फोन करणारा अनोळखी माणूस कोण आहे, याचीही माहिती नसल्याचे त्या म्हणाल्या.
मोर्चात सहभागी होणार नाही, कारण…
आज बीडमध्ये निघणाऱ्या मोर्चात सहभागी होणार नाही, असेही अंजली दमानिया म्हणाल्या आहेत. “या मोर्चामध्ये सर्व राजकारणी मंडळी आहेत. या मोर्चात शरद पवार, जितेंद्र आव्हाड आणि सुरेश धस सामील होत आहेत. हे सर्व राष्ट्रवादीत असताना त्यांना धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड काय चीज आहे, हे माहीत होते. आधी पक्षात असताना त्यांना हे लोक चालत होते, मात्र आता पक्ष बदलल्यामुळे त्यांच्याविरुद्ध हे मोर्चे काढत आहेत. हे सर्व राजकारण असून खरंतर देशमुख कुटुंबियांना न्याय मिळत नाही. त्यामुळे लोकांनी रस्त्यावर उतरून वेगळे आंदोलन उभे करण्याची गरज आहे, असे त्या म्हणाल्या.