मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रिपद स्वत:कडेच ठेवले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास आणि गृहनिर्माण, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ तसेच उत्पादन शुल्क खाते देण्यात आले आहे.
मुंबई : राज्याचे हिवाळी अधिवेशन शनिवारी संपताच महायुती सरकारने आपले खातेवाटप जाहीर केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रिपद स्वत:कडेच ठेवले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास आणि गृहनिर्माण, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ तसेच उत्पादन शुल्क खाते देण्यात आले आहे. फडणवीस यांनी खातेवाटपात गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, पंकजा मुंडे, आशीष शेलार यांना काहीशी कमी महत्त्वाची खाती दिल्याचे दिसते. मात्र, पहिल्यांदाच मंत्रिमंडळात सहभागी झालेल्या शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार गोरे यांना अनुक्रमे सार्वजनिक बांधकाम, ग्रामविकास ही महत्त्वाची खाती दिली आहेत.
राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची आणि अजित पवार, एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. ५ फेब्रुवारीला त्यांचा शपथविधीही पार पडला. त्यानंतर १५ डिसेंबरला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. मात्र, त्यानंतर सर्वांना अपेक्षित असलेले खातेवाटप रखडले होते. हिवाळी अधिवेशनाच्या आधी खातेवाटप होईल अशी आशा असताना प्रत्यक्षात अधिवेशन संपल्यानंतर रात्री फडणवीस यांनी स्वतःकडे गृह, ऊर्जा (अपारंपरिक ऊर्जा वगळून), विधी आणि न्याय, सामान्य प्रशासन, माहिती आणि जनसंपर्क विभाग आणि इतर मंत्र्यांना नेमून न दिलेली उर्वरित खाती ठेवली आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नगरविकास आणि गृहनिर्माण या दोन महत्त्वाच्या खात्यांसह सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) हे महत्त्वाचे खाते देण्यात आले आहे. तर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अपेक्षेप्रमाणे अर्थ आणि नियोजनसह राज्य उत्पादन शुल्क खाते देण्यात आले आहे.
चंद्रकांत पाटील यांच्याकडील उच्च आणि तंत्रशिक्षण, संसदीय कार्य ही खाती कायम ठेवण्यात आली आहेत. जयकुमार रावल यांना पणन आणि राजशिष्टाचार, अतुल सावे यांना इतर मागासवर्ग बहुजन विकास जाती आणि बहुजन कल्याण विकास, गणेश नाईक यांना वने, मंगलप्रभात लोढा यांना कौशल्य विकास, संजय सावकारे यांना वस्त्रोद्योग, आकाश फुंडकर यांना कामगार खाते देण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील उदय सामंत यांना उद्योग, मराठी भाषा विकास, संजय राठोड यांना मृद आणि जलसंधारण, गुलाबराव पाटील यांना पाणीपुरवठा आणि स्वच्छता, शंभूराज देसाई यांना पर्यटन, खनिकर्म, संजय शिरसाट यांना सामाजिक न्याय, प्रताप सरनाईक यांना परिवहन, भरत गोगावले यांना रोजगार हमी, फलोत्पादन तर प्रकाश आबिटकर यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण या खात्याची धुरा सोपवण्यात आली आहे.
हिवाळी अधिवेशनात विविध आरोपांमुळे वादग्रस्त ठरलेले अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांना अन्न आणि नागरी पुरवठा, ग्राहक कल्याण, आदिती तटकरे यांना महिला आणि बालविकास, हसन मुश्रीफ यांना वैद्यकीय शिक्षण, बाबासाहेब पाटील यांना सहकार, मकरंद पाटील यांना मदत आणि पुनर्वसन हे खाते देण्यात आले आहे. मंत्रिमंडळ विस्तारात एकूण ३९ मंत्र्यांनी शपथ घेतली होती. यामध्ये भाजपचे १९, शिवसेनेचे ११ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नऊ मंत्री होते. यातील ३३ जणांनी कॅबिनेट, तर सहा जणांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. भाजपच्या तीन, शिवसेनेच्या दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका मंत्र्याला राज्यमंत्रिपदाची शपथ देण्यात आली होती.