“परळीत मतदान केंद्रावर शाई लावून बाहेर जायचं, ती गँग बटण दाबायची”, व्हिडीओ शेअर करत जितेंद्र आव्हाडांचा दावा.
“परळीत मतदान केंद्रावर शाई लावून बाहेर जायचं, ती गँग बटण दाबायची”, व्हिडीओ शेअर करत जितेंद्र आव्हाडांचा दावा.महायुतीने ईव्हीएममध्ये घोटाळा करून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्याचा आरोप महाविकास आघाडीतील नेत्यांकडून होत होता. दरम्यान, आता मविआ नेत्यांनी दावा केला आहे की सत्ताधाऱ्यांनी निवडणूक जिंकण्यासाठी मतदान केंद्र ताब्यात घेतली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी थेट मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केला आहे. बीडमधील वाढती गुन्हेगारी, गुन्हेगारांना दिल्या जाणाऱ्या संरक्षणावरून आव्हाडांसह अनेक विरोधक थेट धनंजय मुंडेंवर आरोप करत असतानाच आता त्यांच्या निवडणूक विजयावर प्रश्न उपस्थित केले आहेत. आमदार आव्हाड यांनी एक्सवरील एक पोस्ट (व्हिडीओ) रिपोस्ट केली आहे. यामध्ये एक व्यक्ती ईव्हीएम मशीनवर धनंजय मुंडे यांना मतदान करत असल्याचं दिसतंय. मतदान केंद्र ताब्यात घेऊन धनंजय मुंडे यांना मतदान केल्याचा दावा व्हिडीओ शेअर करणाऱ्या व्यक्तीने केला आहे.