जिल्हा बँकेतील नोकरभरती रद्द करावी तसेच आरक्षण लागू करावे, या मागणीसाठी आरक्षण बचाव संघर्ष समितीने २ जानेवारीपासून आंदोलन सुरू केले.
चंद्रपूर : जिल्हा बँकेतील नोकरभरतीची सर्वंकष चौकशी करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरध्वनीद्वारे झालेल्या चर्चेत दिल्यानंतर भाजप ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष मनोज पोतराजे यांनी माजी मंत्री, आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते लिंबूपाणी पिऊन उपोषणाची सांगता केली. मागील १४ दिवसांपासून पोतराजे यांचे आमरण उपोषण सुरू होते. यादरम्यान त्यांची प्रकृती खालावल्याने उपचारदेखील करावे लागले होते. जिल्हा बँकेतील नोकरभरती रद्द करावी तसेच आरक्षण लागू करावे, या मागणीसाठी आरक्षण बचाव संघर्ष समितीने २ जानेवारीपासून आंदोलन सुरू केले.
१६ जानेवारीपासून मनोज पोतराजे, तर २१ जानेवारीपासून रमेश काळबांडे आमरण उपोषणाला बसले होते. या नोकरभरती प्रकरणाची उच्चस्तरीयच चौकशी करावी, या मागणीसाठी मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली होती. मुख्यमंत्र्यांना एक निवेदन देण्यात आले. पोतराजे यांच्या उपोषणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्र्यांनी बुधवारी दुपारी पोतराजे यांच्यासोबत भ्रमणध्वनीद्वारे संवाद साधला व सविस्तर चर्चा केली. नोकर भरतीच्या चौकशीचे आदेश दिलेले आहेत. भरतीप्रक्रियेत जी अनियमितता झाली, त्याचीही चौकशी होईल. त्यामुळे आपण उपोषण मागे घ्यावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. यानंतर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत पोतराजे आणि काळबांडे यांनी उपोषण सोडले.