…महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि या बंगल्याच्या नशिबी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा मान आला.
महाराष्ट्राच्या नवनिर्वाचित सरकारला आता एक महिना पूर्ण होऊन अलीकडेच खातेवाटपही पार पडले. त्याच पाठोपाठ मंत्र्यांच्या दालनांचं आणि बंगल्यांचं वाटपही झालं आहे. आत्तापर्यंत ३१ मंत्र्यांना मिळालेल्या बंगल्यांची यादी समोर आली आहे. महाराष्ट्राच्या मंत्र्यांना मिळालेल्या या बंगल्यांची नाव विशेष लक्षवेधी आहेत. या नावांमध्ये सिंहगड, विजयदुर्ग, पवनगड, सिद्धगड, प्रतापगड किल्ल्यांपासून मेघदूत, ज्ञानेश्वरी ते बौद्धकालीन जेतवनापर्यंत बंगल्यांच्या नावांचा समावेश होतो. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारच्या मंत्र्यांच्या बंगल्याना देण्यात येणाऱ्या नावामागील नेमकी संकल्पना काय याचा घेतलेला हा वेध.
केवळ नाव नाहीत, महाराष्ट्राच्या परंपरेशी जोडलेली नाळ.
महाराष्ट्रातील शासकीय बंगले हे राजकीय सामर्थ्य, सांस्कृतिक वारसा आणि प्रशासकीय महत्त्व या त्रयींचे प्रतीक आहेत. प्रामुख्याने हे बंगले मुंबईत राज्याच्या प्रशासकीय केंद्रस्थानी आहेत. या बंगल्यांना राज्याच्या समृद्ध इतिहासाचे, अध्यात्मिकतेचे आणि निसर्गाशी असलेल्या नात्याचे प्रतीक म्हणून विचारपूर्वक नावे देण्यात आली आहेत. या नावांमुळे महाराष्ट्राच्या ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांशी, सांस्कृतिक स्मारकांशी आणि साहित्यिक तसेच आध्यात्मिक परंपरांशी जोडली गेलेली भावना जागृत होते. या परंपरेचे सखोल विश्लेषण या लेखात करण्यात आलेले आहे.