इंग्रजांच्या नोंदीनुसार ८३४ इंग्रज सैन्यांपैकी २७५ सैनिक मारले गेले. काही जखमी झाले तर काही हरवले. मराठ्यांचे ५०० सैनिक मारले गेले, तर काही जखमी झाले. त्यामुळे मराठ्यांची पकड कमकुवत झाली.
भीमा कोरेगाव येथे लढली गेलेली लढाई ही अनेक अर्थांनी इतिहासातील महत्त्वाची घटना मानली जाते. भारतीय इतिहासातील जातीवाद, ईस्ट इंडिया कंपनीची वसाहतवादी भूमिका यांसारख्या अनेक बाबी एकाच वेळी या लढाईत प्रतिबिंबित झालेल्या दिसतात. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भीमा- कोरेगाव येथे असलेल्या जयस्तंभाला अनेक वेळा भेट दिली होती, तसेच १९४१ मध्ये सिन्नर येथील भाषणात महारांनी कोरेगाव येथे पेशव्यांचा पराभव केल्याचेही नमूद केले होते. इंग्रजांनीही विजयाचा दावा केला आणि याचे वर्णन एक अभिमानास्पद विजय असे केले, आजतागायत या युद्धाची परिणती कायम आहे, तरीही काही मराठाकालीन अभ्यासक पेशव्यांचे सैन्य विजयी झाले असे नमूद करतात.