उपमुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर टीका करत त्यांना पराभवातून शिकण्याचा सल्ला दिला आहे. तसंच पराभवातून शिका अन्यथा संपून जाल असं म्हणत विरोधकांवर टीकाही केली आहे.
नागपूर : राज्यातील उद्योग व परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र पुन्हा एकदा अव्वल झाल्याचे सांगताना एकनाथ शिंदे म्हणाले, ‘महाविकास आघाडीच्या काळात औद्योगिक गुंतवणुकीत राज्य तिसऱ्या क्रमांकावर गेले होते. मात्र, गेल्या अडीच वर्षांत पुन्हा एकदा राज्याने अव्वल स्थान पटकावले आहे. विरोधकांकडून वेदांता-फॉक्सकॉनसारखे प्रकल्प राज्यातून बाहेर गेल्याची ओरड करण्यात येते. मात्र, ते कोणाच्या काळात गेले ते विरोधकांनीच शोधावे. आमच्या अडीच वर्षांच्या काळात देशात होणाऱ्या एकूण परकीय गुंतवणुकीपैकी ५२ टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात करण्यात आली आहे.’
‘जनतेशी संबंधित मुद्दे सभागृहात मांडण्याऐवजी विरोधक केवळ प्रसारमाध्यमांपुढे जाऊन सरकारवर आरोप करण्यातच धन्यता मानतात. इतका मोठा पराभव होऊनही यातून धडा घेतलेला नाही. अजूनही वेळ गेलेली नाही पराभवातून शिका आणि कामाला लागा, अन्यथा संपून जाल’, असा सल्ला देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.
विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना शिंदे बोलत होते. ‘परभणी, बीड, कल्याण या घटना घडल्या असल्या तरी हे कायद्याचे राज्य आहे. गुन्हेगारांवर कठोर कारवाई होणार आहे. हे सर्वसामान्यांना न्याय देणारे, हक्काचे मिळवून देणारे सरकार आहे. विरोधकांकडून आमच्यावर ईव्हीएमचे सरकार अशी टीका करत आरोप करण्यात येत असले तरी आम्ही त्याला उत्तर देण्यापेक्षा जनतेचे काम करण्याला प्राधान्य दिले. त्यामुळे विधानसभेत अनपेक्षित यश मिळाले. आम्हाला कधीही वाटले नव्हते इतक्या मोठ्या प्रमाणात यश मिळेल.
मात्र, विरोधकांनी अजूनही यातून धडा घेतलेला नाही. सभागृहात कमी आणि प्रसारमाध्यमांसमोर बोलण्याला विरोधकांनी प्राधान्य दिले. निवडणुकीच्या निकालानंतर हे स्पष्ट झाले जनतेला काम करणारे लोक आवडतात, घरी बसणाऱ्यांना घरीच बसवण्यात येते’, अशी टीकाही त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केली. आता जनतेने मोठे बहुमत देत पुढील पाच वर्षे दिली असल्याने अधिक जोमाने कामे करणार आहे. त्यामुळे विरोधकांनी आरोपांचे राजकरण न करता जनतेचे प्रश्न सोडवण्यावर चर्चा केली तर चांगले होईल असा सल्लाही यावेळी शिंदे यांनी दिला. नागपूरचे वातावरण लंडनसारखे आहे. काही जण केवळ आनंद, भेटीगाठी, पर्यटन करून निघून जातात. जनतेच्या प्रश्नाशी त्यांना काही घेणे नसते अशी टीकाही त्यांनी केली.