१९९७ साली प्राप्तीकर विभागाने तमिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जे. जयललिता यांची बेहिशेबी मालमत्ता जप्तीचे आदेश दिले होते. यामध्ये महागड्या साड्या, चप्पल, वाईन ग्लासेस, सोने, हिरे आणि आलिशान बसचा समावेश होता.
तमिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जे. जयललिता यांची जप्त केलेली संपत्ती तमिळनाडू सरकारला हस्तांतरित करण्याचा निर्णय सीबीआयच्या विशेष न्यायालयाने घेतला आहे. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एचए मोहन यांनी यंत्रणेला निर्देश देताना सांगितले की, १४ किंवा १५ फेब्रुवारीपर्यंत संपत्तीचे हस्तांतरण पूर्ण करावे. जे. जयललिता यांचा भाचा जे. दीपक आणि भाची दीपा यांनी जयललिता यांच्या संपत्तीवर कायदेशीर दावा केला होता. मात्र त्यांची याचिका कर्नाटक उच्च न्यायालयाने १३ जानेवारी रोजी फेटाळून लावली. त्यानंतर सीबीआयच्या न्यायालयाने हा निर्णय दिला. त्यामुळे २०१६ रोजी निधन पावलेल्या जयललिता यांच्या संपत्तीचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. २१.२८ किलो सोन्याचे दागिने, १०,५०० साड्या, ७५० जोड्या चप्पल, ५०० वाईन ग्लासेस आणि १,२५० किलो चांदीच्या वस्तू, हिरे, चांदीच्या तलवारी अशी डोळे दीपवणारी संपत्ती आता तमिळनाडू सरकारकडे वर्ग केली जाणार आहे.