पुणे शहरात दुर्मिळ अशा गुइलेन बॅरे सिंड्रोम व्याधीने ग्रस्त तब्बल २२ संशयित रुग्ण आढळून आल्यानंतर त्याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोम या अतिशय दुर्मिळ अशा व्याधीची मोठी चर्चा पाहायला मिळत आहे. एका महिलेला या व्याधीनं ग्रासल्यानंतर डॉक्टरांच्या पथकानं तिच्यावर यशस्वीपणे उपचार केल्यामुळे तिने त्यावर मात केल्याचं वृत्तही समोर आलं होतं. पण आता पुण्यात या दुर्मिळ व्याधीचे तब्बल २२ संशयित रुग्ण आढळल्याचं समोर आलं आहे. पुणे महानगर पालिकेकडे अशा प्रकारचे २२ संशयित रुग्ण आढळल्याची माहिती देण्यात आली आहे. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय व पूना हॉस्पिटलमध्ये या आजाराशी संबंधित लक्षणं आढळल्याची तक्रार असणारे रुग्ण दाखल झाल्यानंतर ही माहिती महानगर पालिकेला कळवण्यात आली आहे.
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय व पूना हॉस्पिटल या दोन रुग्णालयांमध्ये या व्याधीशी संबधित लक्षणं दिसून आल्याची तक्रार घेऊन रुग्ण दाखल झाले आहेत. हे रुग्ण प्रामुख्याने सिंहगड रोड परिसरातले असल्याचं इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. या दोन रुग्णालयांव्यतिरिक्त इतरही रुग्णालयांमध्ये काही संशयित रुग्णांना दाखल करण्यात आलं आहे.
प्रशासन सज्ज, संबंधित परिसरात पथक पाठवणार!
दरम्यान, पुणे महानगर पालिकेच्या सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली जाधव यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तसेच, संबंधित परिसरात परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी एक पथक पाठवण्यात येईल, असंही त्यांनी नमूद केलं आहे. “सध्या आम्ही या भागातील एकूण सहा रुग्णांच्या रक्ताचे नमुने गोळा केले आहेत. हे सर्व नमुने इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च – नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ व्हायरोलॉजी (ICMR-NIV) कडे पाठवण्यात आले आहेत”, अशी माहिती डॉ. वैशाली जाधव यांनी दिली आहे.