एचएमपीव्हीचा प्रसार कसा होतो?
एचएमपीव्ही विषाणू संक्रमित व्यक्तीच्या खोकला आणि शिंकण्याद्वारे पसरतो. याशिवाय, संक्रमित व्यक्तीशी हस्तांदोलन किंवा दूषित पृष्ठभागांना स्पर्श केल्यानेही हा विषाणू पसरू शकतो. संसर्ग झाल्यानंतर 3 ते 5 दिवसांत लक्षणे दिसू लागतात.
एचएमपीव्हीची लक्षणे काय आहेत?
सामान्य लक्षणांमध्ये खोकला, वाहणारे नाक, घसा खवखवणे आणि ताप यांचा समावेश होतो. गंभीर प्रकरणांमध्ये चक्कर येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, कर्कशपणा, न्यूमोनिया आणि दम्याचा त्रास जाणवणे यांसारखी लक्षणे दिसू शकतात.
एचएमपीव्हीचा उपचार कसा करावा?
एचएमपीव्ही विषाणूसाठी अद्याप कोणतेही अँटीव्हायरल औषध उपलब्ध नाही. बहुतेक लोकांवर त्याचा सामान्य प्रभाव पडतो, त्यामुळे लक्षणे घरी राहूनच नियंत्रित करता येतात. ज्या लोकांना गंभीर लक्षणे दिसतात, त्यांना ऑक्सिजन थेरपी, IV थेरपी आणि कॉर्टिकोस्टिरॉईड्स (स्टेरॉईड्सचा एक प्रकार) दिला जाऊ शकतो. या विषाणूचा सामना करण्यासाठी अद्याप कोणतीही लस विकसित झालेली नाही.
एचएमपीव्ही विषाणूची भारतातील स्थिती काय आहे?
चीनमध्ये एचएमपीव्ही विषाणूच्या संसर्गाची प्रकरणे वाढत आहेत. भारतामध्येही कर्नाटक आणि गुजरातमध्ये काही रुग्ण आढळले आहेत. भारतीय आरोग्य महासंचालकांनी या विषाणूबद्दल चिंता करण्यासारखं काहीही नसल्याचं म्हटलं आहे. सध्या भारतात या विषाणूचा प्रसार नियंत्रणात आहे.
एचएमपीव्ही विषाणूपासून बचाव कसा करावा?
चएमपीव्ही विषाणूपासून बचाव करण्यासाठी खालील उपाय उपयुक्त ठरू शकतात:
- हात स्वच्छता: साबणाने आणि पाण्याने किमान 20 सेकंद हात धुवा.
- मास्कचा वापर: सर्दी किंवा खोकला असलेल्या व्यक्तींनी मास्क परिधान करावा.
- सामाजिक अंतर: संक्रमित व्यक्तींशी संपर्क टाळा.
- सतत स्वच्छता: दूषित पृष्ठभागांची स्वच्छता नियमितपणे करा.