लार्सन अँड टुब्रोचे अध्यक्षांनी कर्मचाऱ्यांना आठवड्यातून ९० तास काम करावे असे विधान केल्यानंतर त्यांच्यावर टीकेची राळ उठत आहे.
गेल्या काही काळात कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून किती वेळ काम करायचे याबाबत सोशल मीडियासह विविध माध्यमांतून बरीच चर्चा झाली आहे. इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनीही यावर अनेकवेळा भाष्य केले होते. अशात आता लार्सन अँड टुब्रोचे अध्यक्षांनी कर्मचाऱ्यांना आठवड्यातून ९० तास काम करावे असे विधान केल्यानंतर त्यांच्यावर टीकेची राळ उठत आहे. यावेळी त्यांनी, “पत्नीकडे किती वेळ पाहत बसणार त्यापेक्षा काम करा”, असे म्हटल्याने सोशल मीडियावर याची बरीच चर्चा होते आहे.
दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये लार्सन अँड टुब्रोचे अध्यक्ष एसएन सुब्रह्मण्यम यांना कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना विचारण्यात आले की, अब्जावधी डॉलर्सची उलाढाल असलेली लार्सन अँड टुब्रो अजूनही कर्मचाऱ्यांना शनिवारी का काम करायला लावत आहे. यावर त्यांनी दिलेले उत्तर सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे.