एचएमपीव्ही विषाणूच्या संसर्गामुळे सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रत्यक्षात पुण्यात २००४ मध्येच एचएमपीव्हीच्या रुग्णांची नोंद झाली होती. याबाबतचे संशोधनही त्यावेळी प्रसिद्ध झाले होते.
पुणे : चीनमध्ये ह्यूमन मेटान्यूमोव्हायरसचा (एचएमपीव्ही) प्रादुर्भाव वाढला असून, राज्यातही या विषाणूचा शिरकाव झालेला आहे. या विषाणूच्या संसर्गामुळे सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रत्यक्षात पुण्यात २००४ मध्येच एचएमपीव्हीच्या रुग्णांची नोंद झाली होती. याबाबतचे संशोधनही त्यावेळी प्रसिद्ध झाले होते. विशेष म्हणजे, गेल्या दोन वर्षांत एचएमपीव्हीच्या २० रुग्णांची नोंद बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय तथा ससून सर्वोपचार रुग्णालयात झाली आहे.
नेदरलँडमध्ये एचएमपीव्हीच्या पहिल्या रुग्णाची नोंद २००१ मध्ये झाली. त्यानंतर जुलै २००३ मध्ये ससून सर्वोपचार रुग्णालयात श्वसनविकाराची लक्षणे असलेली काही मुले दाखल झाली. त्यांच्यात तीव्र स्वरूपाची लक्षणे दिसून येत होती. त्यामुळे राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेकडे (एनआयव्ही) या मुलांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यावेळी ससूनमधून एकूण १९ मुलांचे नमुने पाठविण्यात आले. त्यातील ५ मुलांना एचएमपीव्हीचा संसर्ग झाल्याचे एनआयव्हीच्या अहवालातून समोर आले.
ससूनमध्ये दाखल मुलांमध्ये श्वसनमार्गाच्या खालच्या भागात तीव्र स्वरूपाचा संसर्ग आणि न्यूमोनिया होता. याचबरोबर श्वसनास त्रास, अंगदुखी, ताप आणि अशक्तपणा अशी लक्षणेही त्यांच्यात होती. एचएमपीव्हीचे निदान झालेल्या मुलांपैकी ४ मुले एक वर्षाखालील तर एक मूल १ ते ५ वर्षे वयोगटातील होते. या पाच मुलांपैकी ३ जण त्यावेळी व्हेंटिलेटरवर आणि २ मुले कृत्रिम ऑक्सिजन पुरवठ्यावर होती. नंतर ‘अमेरिकन सोसायटी फॉर मायक्रोबायोलॉजी’च्या ‘जर्नल ऑफ क्लिनिकल मायक्रोबायोलॉजी’ या संशोधनपत्रिकेत याबाबतचा संशोधन निबंध डिसेंबर २००४ मध्ये प्रसिद्ध झाला. राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेतील शास्त्रज्ञांसह बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ. आरती किणीकर यांनी संशोधन लेख लिहिला होता.
या पार्श्वभूमीवर बोलताना डॉ. किणीकर म्हणाल्या की, जुलै आणि ऑगस्ट २००३ मध्ये बालरोग विभागात दाखल झालेल्या मुलांचे नमुने तपासणीसाठी एनआयव्हीला पाठविले होते. त्यावेळी ५ जणांना एचएमपीव्हीचा संसर्ग झाल्याचे समोर आले होते. नंतर २०१७ पासून श्वसनविकाराचे रुग्ण वाढल्यानंतर त्यांचे नमुने आपण तपासणीसाठी एनआयव्हीला नियमितपणे पाठवतो. एनआयव्हीच्या चाचणीत एकूण १५ प्रकारच्या विषाणू संसर्गाचे निदान होते. त्यात एचएमपीव्हीचे निदानही होते. ससून रुग्णालयात २०२३ आणि २०२४ मध्ये दाखल झालेल्या २० जणांना एचएमपीव्हीचे निदान झाले होते.
एचएमपीव्हीचा संसर्ग आपल्याकडे आधीपासून आढळून येत आहे. ससूनमध्ये श्वसनविकाराच्या रुग्णांमध्ये या विषाणू संसर्गाचे निदान झालेले आहे. या संसर्गामुळे घाबरून जाण्याची कोणतीही आवश्यकता नाही. करोना संसर्गापासून बचावासाठी आपण स्वीकारलेल्या स्वच्छतेच्या आरोग्यदायी सवयींचे सर्वांनी पालन करायला हवे. डॉ. आरती किणीकर, प्रमुख, बालरोगविभाग, बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय
एचएमपीव्हीची लक्षणे ही सर्दीसारखी असतात. वयाच्या पाचव्या वर्षांपर्यंत प्रत्येकाला या विषाणूचा संसर्ग होऊन गेलेला असतो. त्यातून या आजाराविरोधात शरीरात प्रतिकारशक्ती निर्माण होते. त्यामुळे एचएमपीव्हीबाबत विनाकारण भीतीचे वातावरण निर्माण करण्याची आवश्यकता नाही. डॉ. राजेश कार्यकर्ते, प्रमुख, सूक्ष्मजीवशास्त्र विभाग, बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय.