बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वादात सापडलेले अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभय दिले आहे.
मुंबई : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वादात सापडलेले अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभय दिले आहे. मात्र भाजप नेत्यांची कृती लक्षात घेता पक्ष मुंडे यांच्याबाबत फार काही अनुकूल नसल्याचे नसून राजीनाम्यासाठी दबाव वाढत आहे.महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. भाजपचे आमदार सुरेश धसदेखील मुंडे यांच्या हकालपट्टीची सातत्याने मागणी करीत आहेत. ते रोज नवे आरोप करत असताना भाजपने त्यांना आवरलेले दिसत नाही. अभिनेत्री प्राजक्ता माळीला वादात ओढल्यावरून पक्षाने त्यांची कानउघाडणी केली व त्यांनीही दिलगिरी व्यक्त करून विषय संपविला. मात्र धनंजय मुंडे यांच्यावर वेगवेगळे गंभीर आरोप करीत असताना भाजपकडून धस यांना मोकळीक कशी दिली जाते, असा सवाल केला जात आहे.