सावित्रीबाई जोतीराव फुले.

सावित्रीबाई जोतीराव फुले./mycivilexam.com

सावित्रीबाई जोतीराव फुले (जन्म :३ जानेवारी, इ.स. १८३१ – निधन: १० मार्च, इ.स. १८९७)


या एक भारतीय समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि कवयित्री होत्या.[१] भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून त्यांना ओळखले जाते. आपले पती महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासोबत त्यांनी भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. सावित्रीबाईंना भारतीय स्त्रीवादाची जननी मानले जाते. सावित्रीबाई आणि त्यांचे पती हे भारतातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते आहेत.[२][३] या दोघांनी १ जानेवारी, १८४८ रोजी पुणे येथील भिडेवाड्यात मुलींची शाळा सुरू केली. ही शाळा देशात स्थापन झालेल्या सुरुवातीच्या शाळांपैकी एक होती.तत्पूर्वी अमेरिकन मिशनरी सिंथिया फरार यांनी १८२९ मध्ये मुंबईत मुलींची शाळा सुरू केली होती. १८४७ मध्ये, विद्यार्थी साहित्यिक आणि वैज्ञानिक समाजाने मुंबईच्या गिरगाव परिसरात मुलींसाठी कमलाबाई हायस्कूल सुरू केले. पेरी चरण सरकार यांनी १८४७ मध्ये बारासात या बंगाली शहरात कालीकृष्ण गर्ल्स हायस्कूल नावाची मुलींसाठी शाळा सुरू केली. पारशी समुदाय मुंबईने १८४७ मध्ये मुलींसाठी एक शाळा देखील स्थापन केली होती.

महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून सावित्रीबाई फुले ओळखल्या जातात. जात आणि लिंगावर आधारित भेदभाव आणि अन्यायकारक वागणूक नाहीशी करण्यासाठी त्यांनी काम केले. फुले यांनी विधवांचे होणारे केशवपन थांबवण्यासाठी पुण्यात न्हाव्यांचा संप घडवून आणला होता. त्या एक लेखिका देखील होत्या. त्यांनी मराठी भाषेत विपुल लेखन केले आहे.[ संदर्भ हवा ] इ.स. १८९७ मध्ये प्लेगची साथ आल्यावर त्यांनी लागण झालेल्या लोकांसाठी काम केले. या प्रक्रियेत सावित्रीबाई फुले यांना देखील प्लेगची लागण झाली. १० मार्च, १८९७ रोजी त्यांचा मृत्यू झाला.

३ जानेवारी हा सावित्रीबाईंचा जन्मदिवस संपूर्ण महाराष्ट्रात बालिका दिन व महिला मुक्तीदिन म्हणून साजरा केला जातो. १० मार्च १९९८ रोजी भारत सरकारने सावित्रीबाई फुले यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीट प्रसिद्ध केले. २०१५ मध्ये, पुणे विद्यापीठाचे नामकरण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे करण्यात आले. ३ जानेवारी, २०१७ रोजी सावित्रीबाई फुले यांच्या १८६ व्या जन्मदिनानिमित्त गूगल डूडल प्रसिद्ध करून गूगलने त्यांना अभिवादन केले.


सावित्रीबाई जोतीराव फुले यांचे चरित्र..

सावित्रीबाईंच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर गावचे पाटील असणाऱ्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील होते.[४] इ.स. १८४० साली जोतीराव फुले यांचेशी सावित्रीबाईंचा विवाह झाला. लग्नाच्या वेळी सावित्रीबाईंचे वय नऊ, तर जोतीरावांचे वय तेरा वर्षांचे होते. सावित्रीबाईचे सासरे गोविंदराव फुले हे मुळचे कटगुणचे गोरे, परंतु पेशव्यांनी त्यांना पुण्यातील फुलबागेची जमीन बक्षीस दिली म्हणून ते पुण्याला येऊन राहिले व फुलांच्या व्यवसायावरून त्यांना “फुले” हे आडनाव मिळाले.


सावित्रीबाईंचे पती जोतीराव यांना लहानपणापासूनच मातृप्रेम लाभले नाही. त्यांची मावस आत्या सगुणाऊ यांनीच त्यांचा सांभाळ केला होता. सगुणाऊ एका इंग्रज अधिकाऱ्याच्या मुलाच्या दाई म्हणून काम करायच्या. त्यांना इंग्रजी कळायचे व बोलताही यायचे. त्यांनी आपल्या या ज्ञानाचा उपयोग जोतीरावांना प्रेरित करण्यासाठी केला. जोतीरावही शिक्षणाकडे आकर्षित झाले. सावित्रीबाईंना ख्रिश्चन मिशनऱ्यांनी लग्नापूर्वी दिलेले एक पुस्तक त्या सासरी घेऊन आल्या होत्या. त्यावरून जोतीरावांनाही एक नवा मार्ग सापडला. त्यांनी स्वतः शिकून सावित्रीबाईंना शिकवले. सगुणाऊ तर सोबत होतीच. दोघींनी रीतसर शिक्षण घेतले.

१ मे, इ.स. १८४७ रोजी सावित्रीबाईंनी सगुणाऊला मागासांच्या वस्तीत एक शाळा काढून दिली. ही त्यांची पहिली शाळा. गुणाऊंना त्या शाळेत बोलाविण्यात आले. सगुणाऊ तेथे आनंदाने व उत्साहाने शिकवू लागल्या. पुढे ही पहिली शाळा मध्येच बंद पडली. १ जानेवारी, इ.स. १८४८ रोजी पुण्यातील बुधवार पेठेतील भिडेवाड्यात जोतीराव आणि सावित्रीबाईंनी मुलींची शाळा काढली. साऱ्या कर्मठ मनुवादी समाजाच्या विरोधाला न जुमानता विवाहानंतर शिक्षण घेतले आणि शिक्षक, मुख्याध्यापक बनून शिक्षण दिले. केवळ चार वर्षांत १८ शाळा उघडल्या आणि चालवल्या. तत्कालीन ब्रिटिश भारतातली एतद्देशीय व्यक्तीने काढलेली ही पहिलीच मुलींची शाळा ठरली. यापूर्वी मिशनऱ्यांनी आणि अन्य लोकांनी काढलेल्या १४-१५ शाळा उत्तर भारतात होत्या.[ संदर्भ हवा ] या शाळेत सावित्रीबाई मुख्याध्यापिका म्हणून काम पाहू लागल्या. त्या काळात पुण्यातील अन्य भागांतही २-३ मुलींच्या शाळा त्यांनी सुरू केल्या व काही काळ चालवल्या. मुंबईतल्या गिरगावातही त्याच सुमारास स्टूडन्ट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीने ’कमळाबाई हायस्कूल’ नावाची मुलींसाठीची शाळा सुरू केली. मिशनरी नसलेले पिअरी चरण सरकार यांनी मुलींसाठी पहिली शाळा बारासात टाऊन येथे १८४७ मध्ये काढली. शाळेसाठी नवीन कृष्ण मित्र आणि काली कृष्ण मित्र या दोन भावांनी आर्थिक मदत केली. ही शाळा कालीकृष्ण हायस्कूल या नावाने चालू आहे. मुंबईत पारशी लोकांनी १८४९ मध्ये मुले आणि मुलींसाठी पहिली सहशिक्षण शाळा काढली, पण काही दिवसातच या शाळेच्या मुलांसाठी आणि मुलींसाठी अशा दोन शाखा झाल्या.

सावित्रीबाईंच्या शाळेत सुरुवातीला शाळेत सहा मुली होत्या, पण १८४८ साल संपेपर्यंत ही संख्या ४०-४५ पर्यंत जाऊन पोहोचली. या यशस्वी शाळेचे स्वागत सनातनी उच्च वर्णीयांनी “धर्म बुडाला…. जग बुडणार…. कली आला….” असे सांगून केले. कर्मठ सनातन्यांनी विरोध केला, अंगावर शेणही फेकले. काही उन्मत्तांनी तर अंगावर हात टाकण्याची भाषा केली. पण अनेक संघर्ष करत हा सावित्रीबाईंचा शिक्षणप्रसाराचा उपक्रम चालूच राहिला. त्यासाठी त्यांना घर सोडावे लागले. सगुणाऊ सोडून गेली. अनेक आघात होऊनही सावित्रीबाई डगमगल्या नाहीत.

शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रांतही काम करणे गरजेचे आहे, स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे हे सावित्रीबाईंनी ओळखले. काही क्रूर रूढींनाही त्यांनी आळा घातला. बाल-जरठ विवाहप्रथेमुळे अनेक मुली वयाच्या बारा-तेराव्या वर्षी विधवा व्हायच्या. ब्राह्मण समाजात विधवा पुनर्विवाह अजिबात मान्य नव्हता. पतीच्या निधनानंतर अशा विधवांना सती जावे लागे किंवा मग त्यांचे केशवपन करून कुरूप बनविले जाई. विरोधाचा अधिकार नसलेल्या या विधवा मग कुणातरी नराधमाच्या शिकार बनत. गरोदर विधवा म्हणून समाज छळ करणार, जन्माला येणाऱ्या मुलाला यातनांशिवाय काहीच मिळणार नाही अशा विचारांनी या विधवा आत्महत्या करत किंवा भ्रूणहत्या करत.

जोतिरावांनी या समस्येवर उपाय म्हणून बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. सावित्रीबाईंनी ते समर्थपणे चालवले. फसलेल्या वा बलात्काराने गरोदर राहिलेल्या विधवांचे त्या बाळंतपण करत. या बालहत्या प्रतिबंधक गृहातील सर्व अनाथ बालकांना सावित्रीबाई आपलीच मुले मानत. याच ठिकाणी जन्मलेल्या काशीबाई या ब्राह्मण विधवेचे मूल त्यांनी दत्तक घेतले. त्याचे नाव यशवंत ठेवले.

केशवपन बंद करण्यासाठी नाभिक समाजातील लोकांचे प्रबोधन करणे व त्यांचा संप घडवून आणणे, पुनर्विवाहाचा कायदा व्हावा यासाठी प्रयत्न करणे अशी अनेक कामे सावित्रीबाईंनी कल्पकतेने पार पाडली. सत्यशोधक समाजाच्या कार्यातही सावित्रीबाईंचा मोठा सहभाग असे. महात्मा फुले यांच्या निधनानंतर (इ.स. १८९०) सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाच्या कार्याची धुरा वाहिली. आपल्या विचारांचा प्रसार त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून केला. ‘काव्यफुले’ व ‘बावनकशी सुबोध रत्नाकर’ हे काव्यसंग्रह त्यांनी लिहिले. पुढील काळात त्यांची भाषणेही प्रकाशित करण्यात आली.

इ.स. १८९६ सालातल्या दुष्काळात सावित्रीबाईंनी समाजाला सत्कार्याचा आदर्श घालून दिला. पोटासाठी शरीरविक्रय करणाऱ्या बाया-बापड्यांना दुष्टांच्या तावडीतून सोडवून त्यांनी त्यांना सत्यशोधक कुटुंबांत आश्रयास पाठविले. त्यांच्या कार्याला हातभार म्हणून पंडिता रमाबाई, गायकवाड सरकार अशा लोकांनी मदतीचा हात पुढे केला.

इ.स. १८९६-९७ सालांदरम्यान पुणे परिसरात प्लेगच्या साथीने धुमाकूळ घातला. हा जीवघेणा आजार अनेकांचे जीव घेऊ लागला. हा रोग संसर्गजन्य आहे हे कळल्यावर ब्रिटिश शासनाने जबरदस्तीने संभाव्य रुग्णांना वेगळे काढून स्थानांतरित करण्याचा खबरदारीचा उपाय योजला. यातून उद्भवणारे हाल ओळखून सावित्रीबाईंनी प्लेगपीडितांसाठी पुण्याजवळ वसलेल्या ससाणे यांच्या माळावर दवाखाना सुरू केला. त्या रोग्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना आधार देऊ लागल्या.प्लेगच्या रोग्यांची सेवा करताना सावित्रीबाईंनाही प्लेग झाला. त्यातून १० मार्च, इ.स. १८९७ रोजी त्यांचे निधन झाले.

सावित्रीबाई जोतीराव फुले यांचे शिक्षण..


लग्नाच्या वेळी सावित्रीबाई निरक्षर होत्या. ज्योतिरावांनी सावित्रीबाईंना त्यांच्या घरीच शिक्षण दिले.ज्योतिरावांकडे त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणाची जबाबदारी ज्योतीरावांचे मित्र सखाराम यशवंत परांजपे आणि केशव शिवराम भवाळकर यांच्याकडे होती.त्यांनी स्वतःला दोन शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमातही सहभागी करून घेतले. पहिली अहमदनगरमधील अमेरिकन मिशनरी सिंथिया फरार यांनी चालवलेल्या संस्थेत होती. दुसरा अभ्यासक्रम पुण्यातील एका सामान्य शाळेत होता. त्यांचे प्रशिक्षण पाहता, सावित्रीबाई या पहिल्या भारतीय महिला शिक्षिका आणि मुख्याध्यापिका झाल्या असतील.सावित्रीबाईंची जन्मतारीख, म्हणजे ३ जानेवारी हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात, विशेषतः मुलींच्या शाळांमध्ये बालिका दिन म्हणून साजरा केला जातो.

सावित्रीबाई जोतीराव फुले यांचा मृत्यू..


सावित्रीबाई आणि त्यांचा दत्तक मुलगा यशवंत फुले यांनी १८९७ मध्ये नालासोपारा परिसरात बुबोनिक प्लेगच्या जगभरातील तिसऱ्या साथीच्या रोगाने प्रभावित झालेल्यांवर उपचार करण्यासाठी एक क्लिनिक उघडले. क्लिनिकची स्थापना पुण्याच्या बाहेरील भागात, संसर्गमुक्त ठिकाणी करण्यात आली. पांडुरंग बाबाजी गायकवाड यांच्या मुलाला वाचवताना सावित्रीबाईंचा वीरतापूर्वक मृत्यू झाला. गायकवाड यांच्या मुलाला मुंढव्याबाहेरील महार वस्तीत प्लेग झाला हे कळताच सावित्रीबाई फुले त्यांच्या पाठीशी धावून गेल्या आणि त्यांना पाठीवर घेऊन रुग्णालयात नेले. या प्रक्रियेत, सावित्रीबाई फुले यांना प्लेगची लागण झाली आणि १० मार्च १८९७ रोजी रात्री ९.०० वाजता त्यांचा मृत्यू झाला.


सावित्रीबाईंची प्रकाशित पुस्तके साहित्य..

सावित्रीबाई फुले या लेखिका आणि कवयित्रीसुद्धा होत्या. त्यांनी १८५४ मध्ये काव्यफुले आणि १८९२ मध्ये बावनकाशी सुबोध रत्नाकर प्रकाशित केले आणि “जा, शिक्षण मिळवा” नावाची कविता देखील प्रकाशित केली, ज्यामध्ये त्यांनी वंचित लोकांना शिक्षण घेऊन स्वतःला मुक्त करण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यांच्या अनुभवाचा आणि कामाचा परिणाम म्हणून त्या एक उत्कट स्त्रीवादी बनल्या. महिलांच्या हक्कांबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी त्यांनी महिला सेवा मंडळाची स्थापना केली. त्यांनी महिलांसाठी जातीय भेदभाव किंवा कोणत्याही प्रकारचा भेदभाव मुक्त असलेल्या मेळाव्याचे ठिकाण देखील बोलावले. याचे प्रतिक म्हणजे उपस्थित सर्व महिलांनी एकाच चटईवर बसायचे. त्या भ्रूणहत्या विरोधी कार्यकर्त्यासुद्धा होत्या.

त्यांनी महिलासांठी निवारास्थान उघडले, जेथे ब्राह्मण विधवा त्यांच्या मुलांची सुरक्षितपणे प्रसूती करू शकत होत्या आणि त्यांची इच्छा असल्यास त्यांना दत्तक घेण्यासाठी तेथे सोडू शकतात. त्यांनी बालविवाहाविरुद्धही मोहीम चालवली आणि विधवा पुनर्विवाहाचे समर्थन केले.सावित्रीबाई आणि ज्योतिरावांनी सतीप्रथेला कडाडून विरोध केला आणि त्यांनी विधवा आणि वंचित मुलांसाठी घर सुरू केले.

ज्योतिरावांना लिहिलेल्या पत्रात, सावित्रीबाईंनी मध्यस्थी केल्यावर खालच्या जातीतील एका महिलेशी संबंध ठेवल्याबद्दल एका मुलाची त्याच्या गावकऱ्यांनी मारहाण केल्याची कथा सांगितली. त्यांनी लिहिले, “मला त्यांच्या हत्येच्या योजनेबद्दल कळले. मी घटनास्थळी धाव घेतली आणि त्यांना भिती दाखवली आणि ब्रिटिश कायद्यानुसार प्रेमींना मारण्याचे गंभीर परिणाम दाखवून दिले. माझे ऐकून त्यांनी त्यांचे मत बदलले”.


सावित्रीबाई जोतीराव फुले यांचे प्रकाशित पुस्तके..

  • काव्यफुले (काव्यसंग्रह)
  • सावित्रीबाईंची गाणी (१८९१)
  • सुबोध रत्नाकर
  • बावनकशी
  • जोतिबांची भाषणे (संपादिका : सावित्रीबाई फुले १८५६)

सावित्रीबाई जोतीराव फुले यांचे सन्मान..

पुणे येथील हे शिक्षण कार्य पाहून १८५२ मध्ये ईस्ट इंडिया कंपनी सरकारने फुले पतिपत्‍नींचा मेजर कॅन्डी यांच्या हस्ते जाहीर सत्कार केला आणि शाळांना सरकारी अनुदानही देऊ केले. त्यानंतरही सावित्रीबाई फुल्यांनी, भारतातल्या त्या पहिल्या शिक्षिकेने आपले शिक्षण देण्याचे व्रत चालूच ठेवले. त्यांनी ’गृहिणी’ नावाच्या मासिकात काही लेखही लिहिले आहेत.

नमस्कार 👋
It’s nice to meet you.

Sign up to receive
Latest NEWS, Exam Notifications, in your inbox, immediately.

We don’t spam! Read our privacy policy for more info.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अनुक्रमणिका

जाहिरात:

Previous slide
Next slide
Previous slide
Next slide

संबंधित बातम्या:

💡 Disclaimer

The information provided by MyCivilExam is for general informational purposes only. MyCivilExam is an independent app and is not affiliated with or endorsed by any government agency or examination board.

While we strive to ensure the content is accurate and up-to-date, we make no guarantees regarding its completeness, accuracy, or reliability. Users are encouraged to verify all information directly with official sources.

By using this app, you acknowledge that you do so at your own discretion and risk. MyCivilExam is not responsible for any losses or damages arising from the use or reliance on the information provided.